तळेगाव ढमढेरे – शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयातील विद्यार्थांची वारी आणि रिंगण सोहळा नेत्रदीपक आणि लक्षवेधी ठरला.
दिंडी म्हणजे काय, दिंडीची परंपरा, वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदायाविषयी माहिती मुलांना व्हावी, या उद्देशाने आषाढी वारीनिमित्त विद्यालयात दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मैदानात विद्यार्थ्यांनी गोल रिंगण केले होते. यामध्ये अश्व रिंगण सोहळा पार पडला. यामध्ये विद्यार्थांनी गोल रिंगण करून त्यामध्ये रांगोळी काढून त्यावरून अश्वावर एक बालवारकरी बसून हातात पांडुरंगाची पताका घेत रिंगणात विठूमाऊलीच्या गजरात अश्व रिंगण सोहळा पार पडला.
मुलांनी विठोबा व रुक्मिणी, डोक्यावर मंगल कलश व तुळस घेतलेल्या नऊवारी साडी परिधान केलेल्या मुली तसेच धोतर -टोपी -पांढरा कुर्ता, कपाळी गंध-बुक्का, हाती भगवी पताका घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या या रिंगण सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
आयोजन मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण, उपमुख्याध्यापक किरण झुरुंगे यांनी केले होते. रिंगण सोहळा पाहण्यासाठी पालक व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव भुजबळ, अध्यक्षा मंगल भुजबळ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.