Gunaratna Sadavarte : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी काल 25 तारखेपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. यासाठी मनोज जरांगे पाटील यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्यात आला आहे. मात्र मराठा आरक्षणाबाबत विरुद्ध भूमिका घेणारे गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्या काही व्यक्तींनी फोडल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सदावर्ते यांनी मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले आहे. इतकेच काय तर मनोज जरांगेंंना अटक करण्याची मागणी देखील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, “हल्लेखोरांना आणि मनोज जरांगेंना मला प्रश्न विचारायचाय. हीच तुमच्या शांततामय आंदोलनाची व्याख्या आहे का? मला सायलेंट केलं जाऊ शकत नाही, मी या भारताचे जे पिलर असतात 50 टक्के जागांचा, ज्या खुल्या वर्गासाठी जागा असतात, त्या वाचवण्यासाठी माझा लढा आहे. या देशाला जातीत जातीत न तोललं जावं, तर गुणवत्तेत तोललं जावं, यासाठी माझा लढा आहे. माझ्या कष्टाचे आणि घामाचे नुकसान तुम्ही केलं. यापूर्वी 32 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण तुम्ही केली. त्यासंबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारण नसताना कारवाई करण्यात आली. तेव्हापासूनच मला अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत.”
“माझी मुलगी गेल्या आठ दिवसांपासून शाळेत जात नाही. कारण तिलाही मारण्याच्या आणि माझ्या पत्नीला उचलून नेण्यापर्यंत मला धमक्या येत आहेत. अशा प्रकारचे हल्ले, असा आघात होईल, आम्हाला त्रास दिला जाईल, फोन, व्हिडीओ रेकॉर्डिंग, सोशल मीडियावरच्या धमक्या आम्हाला दिल्या जात आहे,” असंही गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं.
यावेळी सदावर्ते यांनी जरांगे यांना इशारा देखील दिला. “जरांगे तुम्हाला मी सांगतो, देवेंद्र फडणवीसांनाही सांगतो, महाराष्ट्रात अशा अघटीत घटनांची श्रृंखला पोलिसांवरील हल्ल्यापासून झाली. ती आज माझ्या घरात येऊन ठेपली. मला हे सांगायचं आहे की, बस्स झालं, ज्या माणसामुळे पोलीस धारातीर्थी पडले, अशा या जरांगेला तातडीनं अटक करा, मुसक्या बांधा, कारवाई करा अन्यथा सर्व गुणवंतांना वाटेल की, अशा प्रकारे जात म्हणून एकत्र आलं तर गुणवंता तोडमोड केली जाऊ शकते”, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
सदावर्ते पुढे म्हणाले, “मी जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो तेव्हा त्यांनी स्वतः माझ्यासमोर संयुक्त पोलीस आयुक्तांना फोन कॉल केला होता. त्यानंतरही कॅबिनेट मंत्र्यांना माझ्यासमोर डीसीपी चिमटे यांना फोन कॉल केला होता. माझ्यावर हल्ला होईल याबाबत पोलिसांनाही माहिती होती. ज्यांनी गाड्यांची तोडफोड केली. ते माझ्या घरातही येण्याचा प्रयत्न करत होते.”
नेमकं काय घडलं?
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची आज सकाळी साडेसहाच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी गाडीची तोडफोड केली. सदावर्तेंच्या परळ येथील घराबाहेर गाडी उभे असताना ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.