नवी दिल्ली – उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड मधील भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी पक्षाने दीडशे नेते तैनात केले आहेत. पश्चिमी उत्तरप्रदेशाच्या 44 मतदार संघांसाठी शंभर ज्येष्ठ नेते पाठवण्यात येणार आहेत. हे नेते तेथे प्रचार तर करतीलच पण पक्षाच्या अन्य प्रचार कामाचे ते समन्वयनही करणार आहेत.
विशेष म्हणजे जिल्हा आणि विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर काम करणाऱ्या नेत्यांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी दिल्ली प्रदेश भाजपचे माजी अध्यक्ष विजेंद्र गुप्ता आणि सरचिटणीस दिनेश प्रतापसिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पश्चिमी उत्तरप्रदेशातील 44 विधानसभा मतदार संघांमध्ये ज्या नेत्यांचे पथक पाठवले जाणार आहे ते तेथे 50 दिवस कार्यरत राहणार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला या पट्ट्यात मोठे यश मिळाले होते व भाजपने 44 पैकी 32 जागा जिंकल्या होत्या.
उत्तराखंड मध्ये 60 भाजप नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे नेते तेथील 20 विधानसभा मतदार संघातील प्रचाराचे काम करतील. त्या नेत्यांच्या कामावर देखरेखेसाठी राजेश भाटिया आणि योगेंद्र चंदोलिया यांना नेमण्यात आले आहे.