नवी दिल्ली – लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आणि परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रुंगला आजपासून दोन दिवसाच्या म्यानमारच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत.
या दौऱ्यात ते म्यानमारचे वरिष्ठ लष्करी अधिकारी तसेच राजकीय नेत्यांची भेट घेणार आहेत. म्यानामारच्या राज्य सल्लागार आंग सान स्यू की यांचीही ते भेट घेणार असून विविध विषयांवर चर्चा होणार आहे.
म्यानमार हा ईशान्येकडचा महत्वाचा शेजारी देश आहे. लडाख भागात भारत आणि चीनमध्ये सध्या असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुखांच्या या दौऱ्याला विशेष महत्व आहे.
सध्याच्या द्विपक्षीय संबंधांना बळकटी देणे आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करणे हे या दौऱ्याचे उद्दिष्ट असून भारताच्या ‘नेबरहूड फर्स्ट’ आणि ‘ऍक्ट इस्ट’ धोरणानुसार म्यानमारबरोबर असलेल्या द्विपक्षीय संबंधांना विशेष महत्त्व आहे.
उभय देशांमध्ये व्यापार आणि दळणवळण, विकास प्रकल्प, ऊर्जा, क्षमता संवर्धन, संरक्षण आणि सांस्कृतिक संबंध इत्यादी विषयांवर चर्चा अपेक्षित आहे.