सातारा – किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आमदार मकरंद पाटील यांच्या कारखाना बचाव शेतकरी पॅनलने सत्ता हस्तगत केल्यानंतर मकरंद पाटील यांनी शनिवारी संध्याकाळी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिरात भेट घेतली. यावेळी उदयनराजे यांनी मकरंद पाटील यांचे पेढा भरवून कौतुक केले.
सहकारामध्ये राजकारणाचा कोणताही स्पर्श नसतो हे सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये वारंवार सिद्ध झाले आहे. आमदार मकरंद पाटील यांनी उदयनराजे यांची घेतलेली भेट जिल्ह्याच्या राजकारणामध्ये चर्चेची ठरली. आमदार पाटील व खासदार उदयनराजे यांनी सुमारे पाऊण तास वेगवेगळ्या विषयावर दिलखुलास चर्चा केली.
मकरंद पाटील यांचे उदयनराजे यांनी पेढे व श्रीफळ देऊन स्वागत केले . कारखान्याच्या कारभारात शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देऊ नका, अशी अपेक्षा उदयनराजे यांनी चर्चेदरम्यान व्यक्त केली. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने मदन भोसले यांची कारखान्यातील 19 वर्षाची सत्ता संपुष्टात आणली. आता किसन वीर कारखान्याला नवे अध्यक्ष कोण या प्रश्नाची चर्चा कारखान्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या पाच तालुक्यांमध्ये सुरू आहे. पाच तालुक्याच्या कार्यक्षेत्रात उभा असणारा उस गाळपासाठी गेला पाहिजे असा आग्रह धरत उदयनराजे यांनी मकरंद पाटील यांना पेढा भरविला.
सातारा तालुक्यामध्ये किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत. मकरंद पाटील यांच्या पॅनेलला विजयी करण्यामध्ये सातारा तालुक्यानेसुद्धा प्रभावी कामगिरी बजावली. खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपचे असल्यामुळे तालुक्यात भाजपचा वरचष्मा राहणार असा अंदाज होता.
दोन्ही लोकप्रतिनिधींच्या राजकीय संपर्काचा उपयोग आमदार मदन भोसले यांना होणार याचीच चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात सातारा तालुक्यात आ. पाटील यांच्या पॅनेलला मताधिक्य मिळाले. खासदार उदयनराजे भोसले व माजी खासदार दिवंगत लक्ष्मणराव पाटील यांचाही स्नेह खूप जुना आहे. खासदारकीच्या तत्कालीन निवडणुकांमध्ये उदयनराजेंना वाई तालुक्याने नेहमीच साथ दिली होती, या संदर्भाची यानिमित्ताने पुन्हा उजळणी झाली.