नवी दिल्ली – कॉंग्रेसने पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांची अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या प्रसिद्धी व प्रचार विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रणदीप सुर्जेवाला यांच्या जागी ही नियुक्ती करण्यात आली असून त्यांना सरचिटणीस, प्रसिद्धी आणि मीडिया प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
सुरजेवाला यांना त्यांच्या सध्याच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे तथापि ते कर्नाटकचे प्रभारी सरचिटणीस म्हणून कायम राहतील. सुर्जेवाला यांची राजस्थानातून नुकतीच राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.
सुर्जेवाला हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांनी पक्षाच्या प्रसिद्धी प्रमुख आणि प्रवक्ते पणाचे काम गेली अनेक वर्षे अत्यंत प्रभावीपणे पार पाडले आहे. त्यांच्या जागी आलेले जयराम रमेश हेही संपर्ककुशल नेते म्हणून ओळखले जातात.