2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या “अपने’ या चित्रपटात धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओल यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धम्माल केली होती. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी बनविलेल्या या चित्रपटाच्या सिक्वलची अनेक दिवसांपासून चर्चा होती. आता चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. “अपने’ चित्रपटाचा सिक्वल “अपने-2’च्या स्क्रिप्टची तयारी सुरू असून चित्रटाच्या शूटिंगचा लवकरच श्रीगणेशा होणार आहे.
अनिल शर्मा यांनी “अपने-2’ची संकल्पना धर्मेंद्र यांना सांगितली असून ती त्यांना खूपच आवडली आहे. या चित्रपटातही धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओल मुख्य भूमिका साकारणार आहेत. पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर तब्बल 13 वर्षांनंतर चित्रपटाचा सिक्वल येणार आहे. या चित्रपटातील अन्य कलाकार अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. पण हा चित्रपट पहिल्या चित्रपटासारख्याच मल्टी स्टारर असणार आहे.
“अपने-2’ची शूटिंग पुढील वर्षी मार्च किंवा एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग मुंबई आणि लंडन येथे करण्यात येणार असून चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम सुरूही करण्यात आले आहे. आता यात धर्मेंद्र, सनी आणि बॉबीशिवाय अन्य कलाकारांबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. तसेच या चित्रपटात सनी देओलचा मुलगा करण देओलही सहभागी होणार का हे अद्याप निश्चित नाही.