नगर – पारनेर मतदारसंघातून विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, नगर शहरातील शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार अनिल राठोड, व श्रीरामपूर मतदार संघाचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ए.बी फॉर्म देऊन उमेदवारी जाहिर केली. त्यामुळे या मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
आज मातोश्री बंगल्यावर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जिल्ह्यातील तिघांना उमेदवारी जाहिर केली आहे. त्यामुळे विरोधकांकडून मोर्च बांधणीला वेग आला आहे. विरोधकांना मात देत माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना श्रीरामपूरसाठी शिवसेनेची उमेदवारी मिळाली आहे.
शिवसेनेच्या पहिल्या यादीत राठोड यांचे नाव आले नाही. मात्र, आज दुसऱ्याच दिवशी राठोड यांना मातोश्रीचे निमंत्रण आले आणि अनिल राठोड यांच्या हातात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: पक्षाच्या उमेदवारीचा अधिकृतपणे एबी फॉर्म दिला. हा फॉर्म देताना उद्धव ठाकरे यांनी राठोड यांच्या संभाव्य मंत्रीपदाबाबत सुतोवाच करतानाच नगर जिल्ह्याला राठोड यांच्या रुपाने कॅबिनेट मंत्रीपद देणार असल्याचे स्पष्ट केले. तसे झाल्यास विजय औटी व अनिल राठोड हे दोघे शिवसेनेकडून जिल्ह्यातील मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असतील!