मुंबई : मुंबईतल्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बीकेसी कोविड सेंटरची पाहणी केली. मुंबईत चौपट वेगाने रुग्णवाढ होतं असून घाबरण्यापेक्षा नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहान किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. यावेळी बोलताना किशोरी पेडणेकर यांनी भाजपाच्या किरीट सोमय्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन टीका केली आहे.
“घाबरण्यापेक्षा आपण काळजी घेऊया. घाबरवणे हे आमच्या रक्तात नाही आणि आम्हीसुद्धा घाबरत नाही. खुर्चीत गांजा मारून कुणालाही बोलता येते. पण परिस्थिती तपासून पाहताना आमच्या बाळासाहेबांनी आम्हाला धाडस दिलं आहे. उद्याच्या मृत्यूला मी घाबरत नाही. त्यामुळे तेवढं धाडस आपण दाखवावे,” असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
मुंबईसह राज्यामध्ये दिवसोंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच निर्बंध आणि लॉकडाउनच्या चर्चा सुरु आहेत. यावरून भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी करोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती सर्वसामान्यांमध्ये दाखवली जात असल्याचं सांगत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता.
तसेच “काही सत्ताधारी नेते स्वत:चं राजकीय वजन वाढवण्यासाठी, आर्थिक कमाईसाठी करोनाची तिसरी लाट, प्रचंड वाढ, लॉकडाउन अशा धमक्या देऊन लोकांमध्ये भीती निर्माण करत आहेत. ते त्यांनी थांबवावे,” असे सोमय्या म्हणाले.