नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या करोनामुळे जगासमोर नवीन संकट उभे राहिले असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत १६ देशात पोहोचलेल्या करोनाच्या नव्या प्रकाराचा काही दिवसांपूर्वी भारतात प्रवेश झाला होता. त्यानंतर आता देशाच्या राजधानीत नव्या प्रकाराने एंट्री केली आहे. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी याबाबतची माहिती दिली.
“दिल्लीतील करोनाबाधित रूग्णांपैकी चार रूग्णांच्या अहवालात व्हायरसच्या नव्या प्रकाराची लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे दिल्लीत येणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. आता दिल्लीत नव्याने कोणत्याही प्रवाशाला प्रवेश दिला जाणार नाही. जे लोक बाहेर गावाहून किंवा बाहेरच्या देशांतून दिल्लीत दाखल झाले आहेत, त्यांचा आम्ही मागोवा घेत आहोत”, अशी माहिती सत्येंद्र जैन यांनी दिली.
Four patients have been found to be positive for the new strain of Coronavirus in Delhi. Flights have been banned and more passengers are not arriving. We are tracing & monitoring people who have already arrived: Delhi Health Minister Satyendar Jain pic.twitter.com/jzoyb6ek3F
— ANI (@ANI) December 31, 2020
ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार आढळून आला. या नव्या प्रकारच्या विषाणूला रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी विमान थांबवली. तरीही नव्या करोनाने भारतात पाऊल ठेवले. २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान ब्रिटनमधून ३३ हजार नागरिक भारतात परतले. यात ११४ प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळून आले.
रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचे प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले होते. यात बंगळुरू येथील प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुन्यापैकी तीन रुग्णांमध्ये नवीन स्ट्रेन (नवीन प्रकार) आढळून आला. हैदराबाद प्रयोगशाळेतील दोघांच्या शरीरात आणि पुण्यातील प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आलेल्या नमुन्यांपैकी एका नमुन्यात हा स्ट्रेन आढळला. त्यामुळे एकूण सहा रुग्णांच्या शरीरात करोनाचा नवा प्रकार आढळून आल्याची माहिती होती. त्यानंतर आता यात नव्याने चार रूग्णांची भर पडली आहे.