नवी दिल्ली : येमेनच्या दक्षिणेला असणाऱ्या अदन विमानतळावर बुधवारी भीषण स्फोट झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. येमेनच्या पंतप्रधानांसह मंत्रीमंडळाच्या सदस्यांना घेऊन येणारे विमान विमानतळावर उतरल्यानंतर काही वेळातच तिथे भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही.
घटनास्थळावरील व्हिडीओमध्ये विमानातील काही सरकारी प्रतिनिधी मंडळातील व्यक्ती विमानाबाहेर येताना दिसत आहेत. सुदैवाने या अपघातामध्ये कोणताही अधिकारी जखमी झालेला नाही. स्फोटाचा आवाज ऐकून विमानाबाहेर आलेले काही अधिकारी पुन्हा आतमध्ये गेल्याचेही या व्हिडीओत दिसत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार येमेनच्या दक्षिणेला असणाऱ्या अदन विमानतळावर सौदी अरेबियामधून सरकारी अधिकाऱ्यांना घेऊन येणारं विमान उतरलं. त्यानंतर हे अधिकारी विमानातून खाली उतरत असतानाच मोठा आवाज झाला आणि धुराचे सम्राज्य विमानतळाच्या आजूबाजूला पसरलं.
An attack hit Aden airport in Yemen shortly after the arrival of the country's prime minister, members of its newly formed government and the Saudi ambassador https://t.co/C7Sk8EHMtH pic.twitter.com/X7Iz0gKPF6
— Reuters (@Reuters) December 30, 2020
येमेन सरकारच्या मालकीच्या या विमानामध्ये प्रवास करणारे दूरसंचार मंत्री नजीब अल अवग यांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटाचा आवाज ऐकून हा स्फोट ड्रोनच्या माध्यमातून घडवण्यात आल्यासारखे वाटले. येमेनचे पंतप्रधान मईन अब्दुल मलिक सईद आणि अन्य बड्या नेत्यांसहीत अधिकाऱ्यांनी विमानतळावरुन शहरातील मशिक पॅसेल येथे हलवण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांची एकच धावपळ सुरु झाल्याचे काही व्हायरल व्हिडीओंमध्ये पाहायला मिळत आहे.
#WATCH Yemen: At least 5 people killed & dozens more wounded in an attack on Aden airport, shortly after a plane carrying a newly formed govt for Yemen arrived from Saudi Arabia today, reports Reuters quoting a local security source
(Video Source: Reuters) pic.twitter.com/a5Xf7vthzu— ANI (@ANI) December 30, 2020
अदन आरोग्य विभागाचे उप प्रमुख असणारे मोहम्मद अल रोउबिद यांनी असोसिएट प्रेसला दिलेल्या माहितीनुसार स्फोटानंतर तेथे किमान १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून ६० हून अधिकजण जखमी असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र नंतर हा मृत्यांचा आकडा वाढून २६ पर्यंत पोहचला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये विमानतळावर बांधकामाला झालेली हानी, तुटलेल्या काचांचे खच दिसत आहे. काही व्हिडीओंमध्ये स्फोटात मरण पावलेल्यांचे मृतदेह दिसून येत आहे. यापैकी एक मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आहे.