3 आठवड्यांत 39 हजार चाचण्या; सापडले 7400 बाधित
पुणे – महापालिकेकडून शहरात सुरू करण्यात आलेल्या रॅपिड ऍन्टिजेन टेस्टमध्ये मागील तीन आठवड्यांत तब्बल 7 हजार 400 करोनाबाधित सापडले आहेत. पालिकेने आतापर्यंत सुमारे 39 हजार चाचण्या केल्या आहेत. यासाठी सुमारे 1 लाख टेस्ट किट विकत घेतले आहे. दरम्यान, या चाचणीचा अहवाल अवघ्या अर्ध्या तासात समजतो. मात्र, त्याच वेळी या चाचण्यांची निगेटिव्ह येण्याची वैधता 99 टक्के असली तरी पॉझिटिव्ह येण्याची वैधता ही 50 ते 84 टक्केच आहे.
शहरात करोनाबाधितांची संख्या अनलॉकनंतर मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर शासकीय चाचणी केंद्राची क्षमता दीड ते दोन हजार चाचण्यांची असून खासगी लॅबकडून या चाचण्यांसाठी सुमारे 2200 रुपये आकारले जातात. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या बहुतांश संशयितांच्या चाचण्या पालिकेकडूनच करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी पालिकेने शहरात रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट सुरू केल्या आहेत.
या चाचणीचा अहवाल अवघ्या अर्ध्या तासात प्राप्त होतो. त्यासाठी पालिकेने 1 लाख कीट खरेदी केल्या असून आणखी दोन किट खरेदीचे पालिकेने नियोजन केले आहे.
त्यामुळे आता पालिकेकडून दैनंदिन चाचण्यांमध्ये ऍन्टिजेन चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले. या चाचणीत निगेटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या अहवाल लगेच प्राप्त होत असल्याने अशा व्यक्तींना लगेच घरी सोडता येते. परिणामी, यंत्रणेवर येणारा ताणही कमी होत आहे.
550 रुपयांमध्ये चाचणी…
ऍन्टिजेन चाचण्यांची संख्या वाढविण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर या चाचण्यांची केंद्र उभारली जात आहेत, तसेच शहरातील कोणत्याही नागरिकांना आपली चाचणी करून घ्यायची झाल्यास पालिकेकडून 550 रुपयांमध्ये ही चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.