डोर्लेवाडी (प्रतिनिधी) – बारामतीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बारामती प्रशासनाच्या वतीने दोन वेळा लॉकडाऊन करण्यात आला मात्र, कोरोना रुग्णांची संख्येत कमी होताना दिसत नाही. त्यातच कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत देखील वाढ होत आहे. ही बारामती करांसाठी घोक्याची घंटा मानली जात आहे. नागरिकांनी देखील प्रशासनाने दिलेल्या नियमाचे पालन करणे गरजेचे आहे.
काल बारामतीमधील 45 स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते त्यापैकी 38 जणांचा अहवाल निगेटिव्ह आले असून बारामती शहरातील चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अजून तीन जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये दोन जण खंडोबा नगर येथील तर समर्थ नगर गुणवडी रोड येथील एक व श्रीराम गल्ली बारामती येथील युवकांचा समावेश आहे.
आत्तापर्यंत बारामतीतील कोरोना रुग्णांची संख्या 119 जाऊन पोहचली आहे. तर मृत्यूची संख्या ही 11 झाली आहे. अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली आहे..