Ram Mandir – अयोध्येतील राम मंदिराच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश सरकारकडून ठोस पाउले उचलली जात आहेत. मंदिराच्या सुरक्षेसाठी अगोदरच स्पेशल कमांडो तैनात करण्यात आले आहेत. मात्र येथे आता लवकरच अंटी ड्रोन प्रणाली तैनात करण्याची तयारी उत्तर प्रदेश पोलिसांकडून केली जाते आहे.
केवळ अयोध्याच नाही तर उत्तर प्रदेशातील अन्य प्रमुख ठिकाणांवरही या प्रणालीची तैनाती केली जाणार आहे. ॲंटी ड्रोन सिस्टिम खरेदीच्या संदर्भात इस्त्रायलशही बोलणीही झाली असल्याचे सांगण्यात आले. त्याच्या खरेदीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे.
२२ जानेवारी रोजी जेंव्हा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला होता त्या दिवशीही या ॲंटी ड्रोन प्रणालीचा वापर करण्यात आला होता. मात्र तेंव्हा उत्तर प्रदेश पोलिसांनी ही प्रणाली भाडेतत्वावर घेतली होती. आता ते स्वत: याची खरेदी करणार आहेत.
इस्त्रायलकडून घेतल्या जाणाऱ्या या प्रणालीच्या अगोदर काही चाचण्याही घेतल्या जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १० ॲंटी ड्रोन सिस्टिम विकत घेतल्या जाणार आहेत. अयोध्येसोबतच मथुरा, लखनौ, वाराणसीसारख्या संवेदनशील ठिकाणी त्यांची तैनाती केली जाईल.
काय आहे वैशिष्ट्य
ॲंटी ड्रोन प्रणाली ३ ते ४ किमी अंतराच्या टप्प्यात येणारे कोणतेही ड्रोन नष्ट करू शकते. कोणत्याही प्रकारचे ड्रोन हुडकण्याची तिची क्षमता आहे. ही लेझरवर आधारित अशी प्रणाली आहे.
सुरक्षा रक्षकांना अगदी वेळेच्या अगोदरच कोणत्याही ड्रोनची माहिती या प्रणालीद्वारे मिळू शकेल व त्यानुसार त्यांना तातडीने पाउले उचलता येतील.
इतकेच नव्हे तर शत्रुचे ड्रोन हॅक करण्याची क्षमताही या प्रणालीत आहे. याखेरीज कोणत्याही ड्रोनवर निशाणा साधून ते नष्ट करण्यासाठी स्नायपरही तैनात केले जातील.