Maratha reservation – मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) होणाऱ्या आत्महत्या काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. लातूरमध्ये आणखी एका तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करत टोकाचे पाऊल उचलले असल्याची घटना समोर येत आहे. लातूर जिल्ह्यातील सावनगीरी येथील एका तरुणाने चिठ्ठी लिहून शेतात गळफास घेत आत्महत्या केली आहे.
करण युवराज सोळुंके (वय 24 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. “मराठा आरक्षणासाठी फाशी घेत आहे’ अशी सुसाईड नोट देखील त्याच्याजवळ सापडली आहे. या घटनेनंतर मराठा समाज बांधव आणि तरुणाचे नातेवाईक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
तसेच, जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका देखील नातेवाईकांनी घेतली आहे. बीकॉमचे शिक्षण झालेला करण सुशिक्षित बेरोजगार आहे. दोघा भावात पाच एकर शेती आहे. करण याने आत्महत्या केल्याचे सकाळी लक्षात आले.
गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली होती. तर, घटनेची माहिती मिळताच निलंगा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह निलंगा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तसेच, पोलीस पुढील तपास करत आहेत.