आतापर्यंत 16 पैकी 13 झाले करोनामुक्त
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील आणखी एक वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला करोनाची बाधा झाली आहे. यामुळे शहरातील कोरोना बाधित पोलिसांची एकूण संख्या 16 झाली आहे. त्यापैकी 13 पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या देहूगाव येथून संत तुकाराम महाराज तर आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी बसने पंढरपूर येथे रवाना झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पालखी सोबत रवाना होणाऱ्या पोलिसांची करोना चाचणी करण्यात आली. त्यात आळंदी नगरपरिषदेच्यावतीने काही पोलिसांची चाचणी झाली.
त्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. यापूर्वी पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीमधील एक वरिष्ठ निरीक्षक व सहायक निरीक्षक हे करोना बाधित आले होते. करोना मुक्त झालेल्या 13 पैकी 11 पोलीस अधिकारी व कर्मचारी हे कर्तव्यावर हजर
झाले आहेत.