पुणे विभागात 40 टक्‍के पेरण्या

3 लाख 11 हजार 54 हेक्‍टरवर शेतकऱ्यांकडून पेरा

पुणे – पुणे विभागातील अनेक भागांत जूनच्या सुरुवातीला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी सुरू केली. सध्या पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत. आतापर्यंत 8 लाख 66 हजार 819 हेक्‍टरपैकी 3 लाख 11 हजार 54 हेक्‍टर म्हणजेच 40 टक्‍के पेरणी झाली.

1 ते 24 जूनदरम्यान आतापर्यंत नगर जिल्ह्यामध्ये 135.7 मिलिमीटर, तर पुणे जिल्ह्यामध्ये 142.1 मिलिमीटर व सोलापूर जिल्ह्यामध्ये 97.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सध्या नगर, पुणे आणि सोलापूरमध्ये खरिपाची तयारी करून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. त्यामुळे ठिकठिकाणच्या निविष्ठा केंद्रामध्ये शेतकऱ्यांची खरेदीसाठी गडबड पहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यात बाजरी, तूर, मूग, मका, भुईमूग व सोयाबीन पिकांच्या पेरणी मोठ्या प्रमाणात झाल्या. काही ठिकाणी अजूनही सुरू आहेत.

भात पट्ट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यांत भात व नाचणीच्या रोपवाटिकेत रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत. सोलापूरमध्ये खरीप हंगामातील पिकांच्या काही प्रमाणात पेरण्या झाल्या असून बाजरी, मका, उडीद, मूग, तूर व सूर्यफूल पिकाची अल्प प्रमाणात पेरणी झाली. जिल्ह्यात सोयाबीनची 37 हजार 811 हेक्‍टरपैकी 23 हजार 663 हेक्‍टर म्हणजेच 62 टक्‍के पेरणी झाली. पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावल्याने पेरणीला आणखी वेग येण्याची चिन्हे आहेत.

नगर जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांच्या पूर्वमशागतीची कामे पूर्ण झाली; तर काही ठिकाणी योग्य पावसाच्या प्रतीक्षेत आहे. अकोले तालुक्‍यात भात रोपवाटिका तयार झाल्या आहेत. जिल्ह्यात कापसाची सर्वाधिक पेरणी झाली आहे. 1 लाख 14 हजार 352 हेक्‍टरपैकी 43 हजार 750 हेक्‍टर म्हणजेच 40 टक्‍के पेरण्या झाल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.