पुणे – “टीईटी’ पेपर फुटी प्रकरणातील आरोपींकडून जप्त पुराव्यातून महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली आहे. यातून त्यांच्या काही साथीदारांची नावेही निष्पन्न झाली असून पोलिसांची तीन पथके त्यांच्या मागावर रवाना केली आहेत. तसेच गुरुवार सुपेकडून आणखी दहा लाख रुपये हस्तगत केले आहेत. तर, तांत्रिक सल्लागार सावरीकर याच्याकडे 1 कोटी 25 लाख रुपये मिळाले आहेत.
पोलिसांनी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फुटी प्रकरणातील आरोपींकडून मोबाइल, लॅपटॉप, हार्डडिस्क जप्त केले आहेत. यातून गुन्ह्याच्या अनुषंगाने उपयुक्त माहिती प्राप्त झाली आहे. गुन्ह्याची व्यापी मोठी असून, तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर यांच्या आणखी साथीदारांची नावे निष्पन्न होत आहे. सावरीकर यासकडून गुन्ह्यातील 1 कोटी 25 लाख रुपये मिळाले असून, या रक्कमेबाबत तो उपयुक्त माहिती देत नसल्याचे सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयाला सांगितले.
दरम्यान न्यायालयाने तुकाराम सुपे (58), अभिषेक सावरीकर (31) यांच्या पोलीस कोठडीमध्ये 30 डिसेंबरपर्यंत वाढ करण्याचा आदेश दिला. याप्रकरणी आणखी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप (57) यांनी फिर्याद दिली आहे. 19 जानेवारी 2020 ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या कार्यालयात हा प्रकार घडला. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सुपे, सावरीकर यांना न्यायालयात हजर केले होते.