पुणे – महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्या तरी दोन्ही पक्ष मुख्यसभेत पुन्हा एकत्र आल्याचे पहायला मिळाले.
विशेष म्हणजे मुख्यसभेत काही विषयांवर दोन्ही पक्षांमध्ये वाद झाले तरी शहरातील दोन रस्त्यांच्या कामांसाठी मात्र या दोन्ही पक्षांनी “एकत्र रस्ता धरला” त्यामुळे शिवसेना, कॉंग्रेस पुन्हा एकाकी पडल्याचे मुख्यसभेत दिसून आले.
महापालिकेच्या डिसेंबरच्या मुख्यसभेत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 च्या कलम 205 अन्वये दोन रस्ते आखण्यासाठीचे प्रस्ताव होते. बिबवेवाडी-कोंढवा रस्ता ते गंगाधाम-शत्रुंजय मंदिर रस्ता या दोन्ही रस्त्यांना जोडणारा प्रस्तावित 24 मीटर रस्ता तयार करण्यासाठी भाजपचा आग्रह होता. तर, सुदर्शन केमिकल्स ते संगमवाडी रस्ता तसेच मुळा-मुठा नदीवर पूल बांधणे या प्रस्तावांना राष्ट्रवादी आग्रही होती. त्यामुळे दोन्ही पक्ष मुख्यसभेत एकत्र आले.
त्यातील बिबवेवाडीतील प्रस्तावित रस्ता एका बड्या बांधकाम व्यावसायिकांसाठी असल्याची अर्थपूर्ण चर्चा आहे. त्यामुळे या रस्त्याला महाविकास आघाडीचा विरोध असेल अशी चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात राष्ट्रवादीलाही एक रस्ता मंजूर करायचा असल्याने आयत्यावेळी शहराच्या विकासाचे कारण देत सत्ताधारी आणि राष्ट्रवादी एकत्र आले. त्यामुळे बिबवेवाडी येथील प्रस्ताव मंजूरीस येताच कॉंग्रेस-शिवसेनेने याबाबत प्रश्नांची सरबत्ती केली.
मात्र, त्यावरून चर्चा होऊ द्यायची नसल्याने या विषयावर तातडीने मतदान पुकारण्यात आले. त्यात, भाजप-राष्ट्रवादीने एकत्र येत हा प्रस्ताव मंजूर करून घेतला. बिबवेवाडी रस्त्याचा प्रस्ताव मुख्यसभेत मंजूर होण्या आधीच पालिका प्रशासनाने हा रस्ता पीपीपीवर करण्यासाठी 90 कोटींची निविदा काढली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी हा प्रस्ताव मुख्यसभेत मंजूर न झाल्याने प्रशासनाने आपली चूक लक्षात येताच तातडीनं ती रद्द केली. मात्र, त्यानंतर काही तासातच पुन्हा मुख्यसभेत प्रस्ताव मंजूर झाल्याने प्रशासन फेर निविदा काढण्याच्या तयारीत आहे.