बंगळुरू – कर्नाटकच्या बंगळुरू येथील रामेश्वर कॅफे स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएला आणखी एक यश मिळाले असून आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुझम्मिल शरिफ असे त्याचे नाव असून तोच या कटाचा सूत्रधार होता. कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश अशा तीन राज्यांतील डझनभर ठिकाणी छापे टाकल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आता तो एनआयएच्या कोठडीत आहे.
३ मार्च २०२४ रोजी या स्फोटाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर या स्फोटात मुस्सविर शाजीब हुसेन, अब्दुल मथीन ताहा या दोघांचीही नावे समोर आली होती. सध्या ते फरार आहेत. आज अटक करण्यात आलेल्या मुझम्मिल शरिफ याने अन्य दोन आरोपींना मदत पोहोचवली होती. रामेश्वर कॅफेत आयईडी पोहोचवण्यात त्याने मदत केली होती.
१ मार्च २०२४ रोजी कॅफेत स्फोट झाला होता. त्यात त्यावेळी तेथे उपस्थित असलेले ग्राहक आणि कॅफेचे कर्मचारीही जखमी झाले होते. काही लोकांना गंभीर इजा झाल्या होत्या. तर स्फोटात कॅनेचे प्रचंड नुकसान झाले. आरोपींना पकडण्यासाठी तपास संस्थेने अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. दोन आरोपी ताब्यात आले असले तरी अजून दोघे फरार आहेत.