आतापर्यंत तब्बल एक लाख नमुने तपासणी
पुणे – शहरात आतापर्यंत तब्बल एक लाख नमुने तपासणीचा टप्पा पार पडला. यामध्ये 14 हजार 185 बाधित सापडले आहेत. गुरुवारी (दि. 25) दिवसभरात आणखी 531 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर 13 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज, अत्यवस्थ बाधितांच्या संख्येने 300चा टप्पा ओलांडून प्रशासनाची चिंता वाढवली आहे.
बुधवारी (दि. 24) 3 हजार 416 संशयितांचे स्वॅब घेण्यात आले होते. तर, त्याअधीच्या स्वॅबमधील काही अहवाल प्रतीक्षेत होते. त्यानुसार मागील दोन दिवसातील साधारण तीन हजार नमुने तपासणीच्या अहवालातून 531 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तर आजूनही काही अहवाल प्रतीक्षेत असून, आज (दि. 25) दिवसभरात आणखीन 3 हजार 53 स्वॅब घेण्यात आले. आजारी व्यक्ती, प्रतिकारशक्ती कमी असलेले बाधित उशिराने रुग्णालयात येत असल्यामुळे अत्यवस्थ बाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. आतापर्यंत 250 पर्यंत असलेली संख्या आज थेट 316 वर जावून पोहोचली आहे. सद्यस्थितीत शहरातील विविध रुग्णालयात 5 हजार 325 बाधितांवर उपचार सुरू असून 63 बाधितांना व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे, तर, 253 बाधित अतिदक्षता विभागात आहे.