पिंपरी – करोनाच्या आणखी 346 रुग्णांची गुरुवारी (दि. 15) भर पडली. त्यामध्ये शहरातील 322 तर, शहराबाहेरील 24 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 13 करोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
शहरामध्ये आत्तापर्यंत करोनाचे एकूण 84 हजार 886 रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी एक हजार ते 1 हजार 200 रुग्ण दररोज आढळत होते. सध्या दररोज सरासरी 250 ते 500 रुग्ण आढळत आहेत. म्हणजे सध्या निम्म्याहून अधिक रुग्णसंख्या घटली आहे. 13 करोनाबाधित रुग्णांचा आज उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 2 आणि शहराबाहेरील 11 रुग्णांचा समावेश आहे.
वाकड येथील 78 वर्षीय वृद्ध आणि पिंपळे गुरव येथील 34 वर्षीय महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. शहराबाहेरील 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 8 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे.
महापालिका रुग्णालयांमध्ये सध्या 2 हजार 291 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. करोनामुक्त झालेल्या 534 जणांना आज घरी सोडण्यात आले. आत्तापर्यंत एकूण 80 हजार 280 रुग्ण बरे झाले आहेत.
करोनाने शहरातील एकूण 1 हजार 457 जणांचा बळी घेतला. तर, शहराबाहेरील 591 जणांना प्राण गमवावे लागले आहे. दिवसभरात महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी 3314 संशयित दाखल झाले. तसेच गेल्या दोन दिवसांमध्ये केलेल्या तपासणीपैकी 3117 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच 767 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
जिल्हा रुग्णालयातून चार जणांना “डिस्चार्ज’
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात गुरुवारी 8 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, 4 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. करोनामुक्त झालेल्या दोन महिला आणि दोन पुरुष रुग्णांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. रुग्णालयात आत्तापर्यंत एकूण 1 हजार 487 करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यातील 475 रुग्ण बरे होऊन घरी परतले. 541 रुग्णांना होम क्वॉरंटाइन केले. 282 रुग्णांना अन्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले. 140 जणांचा मृत्यू झाला. 49 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यातील 29 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.