श्रीनगर -जम्मू-काश्मीरमधील प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येऊन एक आघाडी स्थापन केली आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा परत मिळवून देण्याच्या उद्देशातून ते पाऊल उचलण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी गुरूवारी विविध राजकीय पक्षांची बैठक झाली.
त्या बैठकीला अब्दुल्ला यांचे पुत्र ओमर आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती या माजी मुख्यमंत्र्यांबरोबरच माकप नेते मोहम्मद युसूफ तारिगामी, पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सज्जाद लोन, पीपल्स मुव्हमेंटचे नेते जावैद मिर उपस्थित राहिले. त्या बैठकीमुळे जम्मू-काश्मीरला पुन्हा विशेष राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेऊन विविध पक्ष एकवटल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
विशेष दर्जासाठी घटनात्मक लढा देण्याचा निर्धार त्या पक्षांकडून व्यक्त करण्यात आला.
केंद्रातील मोदी सरकारने मागील वर्षी 5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्दबातल केला. त्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश स्थापन करण्यात आले.
त्या पाऊलाचे अनुचित पडसाद उमटू नयेत यासाठी जम्मू-काश्मीरमधील प्रमुख राजकीय नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले. त्यातील बहुतांश नेत्यांची सुटका काही महिन्यांपूर्वी झाली. मात्र, तब्बल 14 महिन्यांनी मेहबुबा यांची नुकतीच सुटका करण्यात आली. त्यानंतर राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आघाडी स्थापन केली आहे.