अत्यवस्थ बाधितांची संख्याही वाढतेय
पुणे – शहरात करोनातून आतापर्यंत तब्बल 5 हजार 19 जण ठणठणीत बरे झाले आहेत. तर आज दिवसभरात 85 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, दुसऱ्या बाजूला मागील आठ दिवसांत अत्यवस्थ बाधितांची संख्या वाढत असून, ही संख्या 200 पार गेली आहे. त्यामुळे मृत्यूची संख्याही दररोज सरासरी 6 ते 9 आहे.
गेल्या 24 तासांत नमुने तपासणी अहवालातील 159 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये डॉ. नायडू -119, ससून-6 तर खासगी रुग्णालयातील 34 जणांचा समावेश आहे. बाधितांची एकूण संख्या 7,881 इतकी झाली आहे. सध्या 2, 484 बाधितांवर उपचार सुरू असून, त्यातील 209 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील 50 जणांना व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे.
6 जणांचा करोनाने मृत्यू
गेल्या 24 तासांत शहरातील आणखी 6 जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यात वयवर्षे 36 ते 83 या वयोगाटातील तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. या व्यक्ती सिंहगड रोड, शिवाजीनगर, येरवडा, नारायण पेठ, कॅम्प परिसरातील होत्या. यातील बहुतांश व्यक्तींना जुने आजार होते.