पुणे – शहरात आणखी 149 जणांना करोना संसर्ग झाल्याचे गेल्या 24 तासांत समोर आले आहे. त्यामुळे बाधितांची 3 हजार 747 वर पोहोचली आहे. तर, दुसरीकडे ठणठणीत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्याही आज 110 आहे.
गेल्या 24 तासांत 1 हजार 459 जणांचे नमुने घेण्यात आले होते. डॉ. नायडू- 96, ससून-11 आणि खासगी रुग्णालयांत 42 बाधित व्यक्ती सापडले आहेत. सध्या 156 जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यातील 43 जणांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. तर 113 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शहरातील विविध रुग्णालयांत मिळून 1 हजार 630 बाधितांवर उपचार सुरू आहेत. शासकीय रुग्णालयात 1 हजार 630 व अन्य खासगी रुग्णालयात 422 जणांवर उपचार सुरू आहेत.
दिवसभरात आठ जणांचा करोनामुळे मृत्यू
शहरात करोनामुळे मंगळवारी दिवसभरात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये गंज पेठेतील 79 वर्षीय व्यक्तीला दि. 15 मे रोजी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले होते. हडपसर येथील 67 वर्षीय व्यक्तीला 6 मे रोजी नोबेल हॉस्पिटलमध्ये, कोंढवा परिसरातील 70 वर्षीय व्यक्तीला 12 तारखेला हडपसर येथील सह्याद्री तर कोंढवा येथील 72 वर्षीय व्यक्तीला आज सकाळी डेक्कन येथील सह्याद्री रुग्णालयात दाखल केले होते.
तसेच येरवडा परिसरातील 65 आणि 64 वर्षीय दोन महिला, मंगळवार पेठेतील 50 वर्षीय महिलेला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सातही जणांचा मंगळवारी (दि. 19) उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर येरवडा परिसरातील 50 वर्षीय महिलेचा 16 मे रोजी नायडू रुग्णालयात मृत्यू झाला होता.