मुंबई :- आत्मनिर्भर भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी अविश्रांत परिश्रम करणारे भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांना “लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार” जाहीर झाला. हा मोदी यांच्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाचा गौरव आहे. मी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. असं म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले आहे.
पुढेे बावनकुळे यांनी म्हटले आहे की,गेल्या शतकात लोकमान्य टिळकांनी “स्वराज्य” या शब्दाच्या रूपाने भारतीय स्वातंत्र्याचा ज्वलंत पुरस्कार करणारा हुंकार भारतीय जनतेच्या मनामनांत रुजवला. आणि भारतीय स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले.
‘स्वराज्य’ या जयघोषाने भारतीयत्वाची जी ज्योत मनामनांत पेटली; त्या ज्योतीचा प्रकाश अजूनही तेवत आहे. मोदीजींनी दिलेली “आत्मनिर्भर भारत ” ही स्वयंसिद्ध भारताची घोषणा म्हणजे लोकमान्यांच्या “स्वराज्य” या वचनाचे नवभारताच्या निर्मितीसाठी पडलेले एक दमदार पाऊल आहे, असंही त्यांनी म्हटले आहे.
21 व्या शतकाचे महानायक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मोदी यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो, अनंत शुभेच्छा देतो. असं बावनकुळे यांनी म्हटले आहे.