नवी दिल्ली : संपूर्ण देशात सध्या एका धाडसत्राची जोरदार चर्चा आहे. कानपूरमधील अत्तर व्यावसायिक पियूष जैनच्या घरावर मारलेला छापा आणि ते सापडलेली कोट्यावधींची संपत्ती आढळून आली आहे. दरम्यान, हा सारा घटनाक्रम लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या सर्व प्रकरणावर चित्रपट बनवण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशमधील कानपूर आणि कन्नोजमध्ये आयकर विभागाने केलेल्या छापेमारीवर चित्रपट निर्माता कुमल मंगत पाठक हे चित्रपट बनवणार आहेत. या चित्रपटाचं नाव ‘रेड-२’ असणार आहे. पाठक यांनी ही घोषणा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ‘काशी चित्रपट महोत्सवा’मधील एका पॅनल डिस्कशनदरम्यान केली. विशेष म्हणजे कुमार मंगत पाठक हेच अजय देवगणच्या ‘रेड’ या चित्रपटाचे निर्माते होते.
याविषयी एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, निर्माता कुमार मंगत पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रेड’ या चित्रपटामधून भितींमधूनही पैसे निघू शकतात असे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला. मात्र कानपूर आणि कन्नौजमध्ये झालेल्या आयकर छापेमारीमध्ये खरोखरच भितींमधून पैसे निघाल्याचं पहायला मिळालं. त्याच पार्श्वभूमीवर पाठक यांनी आता ‘रेड-२’ बनवण्याचा निर्णय घेतल्या. या चित्रपटामध्ये भितींमध्ये पैसे लपवून ठेवल्याचे दाखवण्यात येईल असे पाठक म्हणाले आहेत.
पाठक यांची निर्मिती असणारा ‘रेड’ या चित्रपटामध्ये अजय देवगण एक आयकर अधिकारी दाखवण्यात आला होता. तो एका नेत्याच्या घरी छापेमारी करतो. या चित्रपटामध्ये अभिनेत्री इलियाना डिक्रुझने अजयच्या पत्नीची तर सौरभ शुक्ला यांनी नेत्याची भूमिका साकारली होती. मात्र आता ‘रेड-२’मध्ये अजयच मुख्य भूमिकेत असेल की नाही याची काही घोषणा पाठक यांनी केलेली नाही.