आळंदी – येथील श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालयात पुणे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ” सावित्रीबाई फुले आणि आजची स्त्री ” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
व्याख्यानाच्या व्याख्यात्या ॲडव्होकेट क्रांती कराळे गारगोटे यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवन परिचय करून देत सावित्रीबाईंनी अज्ञान, अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढी यातून स्त्रियांची शिक्षणाच्या माध्यमातून कशी सुटका केली. याबाबत सविस्तर विवेचन करीत आजची स्त्री हुंडाबळी, भ्रूण हत्या, बलात्कार व अॅसिड हल्ले यापासून कशी सुरक्षित राहू शकते याबाबत मत व्यक्त करीत आज क्रांतीज्योती सावित्री व राजमाता जिजाऊ यांच्या संस्कार व शिकवणुकीची स्त्रिजीवनात कशी आवश्यकता असल्याचे संगत मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी आज स्त्रियांनी सावित्रीबाईच्या विचाराचा वसा आणि वारसा चालविण्याची गरज व्यक्त करीत ज्या ठिकाणी नारीची पूजा होते तेथे देवाचा वास असतो म्हणून नारीदेवतेचा सन्मान केला पाहिजे असे मत व्यक्त करीत केवळ थोरांचे नावे न घेता त्यांच्या कार्याचा आदर्श जपला पाहिजे असे सांगितले. महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर महिला सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रा.सोनाली अभंग, प्रा. शैला तापकीर, पूजा बवले, यश भोरे, रुपेश बरणे यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. रणजीत कदम, प्रा. संजीव कांबळे, प्रा. प्रेरणा पाटील यांनी केले. मयूर ढमाले यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रा. डाॅ. पांडुरंग मिसाळ , डॉ. दादासाहेब गारगोटे, महाविद्यालय व रामचंद्र पाटील औटी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, व महाविद्यालयातील सर्व शाखेतील विद्यार्थी उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा.करिष्मा सातपुते यांनी केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. प्रेरणा पाटील यांनी करून दिला. आभार प्रा. दिपाली सोनवणे यांनी मानले. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.