नारायणगाव, (वार्ताहर) – धनगरवाडी (ता. जुन्नर) कारखाना फाटा येथील मोहटादेवी मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा नववा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासून धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल होती.
सकाळी देवीच्या मूर्तीला श्री सुक्ताने महाअभिषेक घालण्यात आला. त्यानंतर देवीला नूतन वस्त्र परिधान करून पाथर्डी येथील वे. शा. सं. अनिकेत कुलकर्णी व ब्रह्मवृंदाने मंत्रांच्या जयघोषात देवीचा चंडीयाग केला. तर मंदिराच्या प्रांगणात दुपारी पारंपरिक पद्धतीने देवीचा गोंधळ घालण्यात आला.
संध्याकाळी महाआरती झाल्यानंतर भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच सायंकाळी मनोरंजनासाठी संगीत भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक सोहळ्यासाठी धनगरवाडी व पंचक्रोशीतील भक्तांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले. सोहळ्याचे नियोजन राजेंद्र खिलारी, हनुमंत शेळके, गणेश शेळके ,पांडुरंग शेळके ,मंगेश शेळके संतोष शेळके, प्रशांत शेळके तसेच व्यापारी असोसिएशन, महिला बचत गटाचे सभासद यांनी विशेष परिश्रम घेऊन केले होते.