Anjali Damania : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी अंबड येथील आरक्षण बचाव एल्गार सभेतून राज्य सरकारला इशारा दिला होता. या सभेतून भुजबळांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करत अंजली दमानिया यांनी केला तसेच आपण भुजबळांविरोधांत मोठा खुलासा करणार असल्याची घोषणा काळ त्यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर अंजली दमानिया आज छगन भुजबळ यांच्या घरासमोर पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा करणार होत्या. त्यासाठी त्या आपल्या कारने छगन भुजबळांच्या घराच्या दिशेने जात होत्या. मात्र मुंबई पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
अंजली दमानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. तत्पूर्वी, अंजली दमानिया यांना महिला पोलीस कर्मचारी ताब्यात घेत असताना त्यांनी पोलीस वाहनात बसण्यास नकार दिला. यावरून महिला पोलीस आणि दमानिया यांच्यात सौम्य झटापट झाल्याचेही दिसून आले.
छगन भुजबळ यांच्याबाबत अंजली दमानिया या नेमका कसला खुलासा करणार होत्या? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. छगन भुजबळ यांच्या घरासमोर पत्रकार परिषद घेऊन मी सर्व खुलासा करणार आहे, अशी भूमिका अंजली दमानिया यांनी घेतली आहे. मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणावरून सुरू झालेला हा वाद आता छगन भुजबळ विरुद्ध अंजली दमानिया असा होताना दिसत आहे.
दरम्यान, अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी अंबड येथील आरक्षण बचाव एल्गार सभेतून राज्य सरकारला इशारा दिला होता. ‘ओबीसी’मधील ६० टक्के लोक भाजपाला मतदान करतात. त्यामुळे जर ‘ओबीसीं’च्या ताटातून काढून ते त्यांना (मराठा समुदाय) देणार असाल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असं भुजबळ यांनी म्हटले होते.