fbpx

प्राणी पाळताय? आधी महापालिकेत नोंद करा

मागील 15 वर्षांत फक्‍त 2,700 जणांनी घेतला परवाना


मालकांना लवकरच नोटीस : कारवाईचा इशारा

पुणे – पाळीव प्राणी घरात ठेवण्यासाठी महापालिकेचा परवाना लागतो, हेच अनेकांना माहिती नसते. काहीजण तर याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, आता विनापरवाना प्राणी पाळणाऱ्यांना महापालिका नोटीस पाठवणार असून, त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.

पाळीव प्राणी घरात ठेवण्यला परवाना बंधनकारक असताना गेल्या 15 वर्षांत केवळ 2,700 नागरिकांनी हा परवाना घेतला आहे. वास्तविक यापेक्षा कित्येक पटीने जास्त नागरिक विविध प्रकारचे प्राणी पाळतात.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून परवान्यासाठी 500 रुपये शुल्क आकारले जाते; तसेच आवश्‍यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर हा परवाना दिला जातो. जानेवारी 2005 पासून डिसेंबर 2019 पर्यंत दोन हजार 700 नागरिकांनी परवाना घेतला आहे; हे सगळे परवाने कुत्रा पाळण्याचेच आहेत. शहरात तब्बल 2 लाख कुत्री आहेत त्यापैकी पाळीव कुत्र्यांची संख्या साडेअठरा ते एकोणीस हजार एवढी आहे.

महापालिका हद्दीत असलेल्या पाळीव कुत्र्यांच्या संख्येचा विचार करता केवळ 2,700 परवाने महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिले आहेत. कुत्रा पाळण्याचे लायसन्स देण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग आवश्‍यक ती जनजागृती करत नाही. त्यामुळे हे शुल्क मिळत नसून महसूल बुडत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.