मुंबई – नायक, स्लम डॉग मिलेनियर, राम लखन असे अनेक दर्जेदार चित्रपट देणाऱ्या अभिनेता अनिल कपूर यांचं नाव खेतलं तरी खळखळत्या उत्साहाने भरलेला आणि तरुणांनाही लाजवेल असा चेहरा आपल्या समोर येतो. आपल्या अभिनयासोबत लूक मेंटेन ठेवण्यासाठी प्रसिद्ध असल्यामुळे अनिल कपूरचे बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीत देखील मोठे फॅनफॉलोविंग आहे. नेहमीच चर्चेत असणारे अभिनेते अनिल कपूर सोशल मीडियावर देखील चांगलेच सक्रिय असतात.
दरम्यान, नुकतंच अनिल कपूर यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून, सध्या हा फोटो सगळीकडे तुफान व्हायरल होत आहे. अनिल कपूर यांनी पोस्ट केलेला हा फोटो मराठी कलाविश्वातील दिवंगत अभिनेते ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ यांचा आहे. सध्या त्यांचा हा फोटो सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.
शेअर केलेला हा फोटो बहुचर्चित ‘हमाल दे धमाल’ या चित्रपटातील पुरस्कार मिळतानाचा सीन आहे. या फोटोत लक्ष्मीकांत बेर्डे यांनी हातात पुरस्कार घेतल्याचे दिसत आहे. तर त्यांच्या शेजारी अनिल कपूर आहेत. या फोटोला अनिल कपूर यांनी एक कॅप्शन देखील दिल आहे.
ते म्हणतात, “संपूर्ण महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकांना मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा. या चित्रपटात काम करणं माझ्यासाठी खूप मोठी आणि सन्मानाची गोष्ट आहे. हा चित्रपट माझ्या जवळचा मित्र लक्ष्मीकांत बेर्डेच्या सगळ्यात अप्रतिम चित्रपटांपैकी एक आहे आणि आजही आपल्याला त्याची आठवण येते”. या आशयाचे कॅप्शन अनिल कपूर यांनी दिल आहे.