मुंबई : ‘करोना’ या तीन अक्षरी शब्दांनी गेल्या तीन वर्षांपूर्वी जगभरात मोठा धुमाकुळ घातला होता. जगात करोनाची कोट्यावधी लोकांना लागण झाली. तर करोनामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला. या करोना आजाराच्या अस्तित्वावरच ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. करोना हे ‘बायोलॉजिकल वॉर’ होते, असे श्री श्री रविशंकर म्हणाले. त्यासोबतच करोनावरच्या लसींवर त्यांनी संशय व्यक्त केला आहे.
करोना हा आजार एक ‘बायोलॉजिकल वॉर’ (जैविक युद्ध) असल्याचे मी म्हणालो होतो. त्यावेळी किती गहजब झाला होता. तेव्हा लोक आणि आमचे कार्यकर्तेही म्हणायचे, गुरूजी!, तुम्ही असं बोलू नका. तुम्ही शांत राहा. पुढे मी म्हणत असलेलं सिद्ध झालं. करोना लसीवर संशोधन केलेल्या अनेक देशांनीही मान्य केलं की यावरील लस या आजारावर परिणामकारक नाही.
करोनाची लस या आजारावर प्रभावीपणे काम करीत नसल्याचेही ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर मी माझ्या वैद्यांना यावर एक प्रभावी औषध तयार करण्याचे सुचवले. त्यांनी हे आव्हान स्विकारत संपुर्ण देशी औषध तयार केलं. त्याचं नाव आम्ही ‘नॉक 19’ असे ठेवले. इतर परदेशी कंपन्यांच्या नावाच्या पार्श्वभूमीवर आम्ही या औषधाला हे नाव दिले.
या सत्संगात श्री श्री रविशंकर यांनी विदर्भात होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांवर चिंता व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा मूळ शोधलं तरच यावर कायमस्वरूपी उपाय शोधता येतील, असे श्री श्री रविशंकर म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी देशी बियाण्याच्या संगोपनावर भर देण्याचं आवाहन शेतकऱ्यांना केले. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी देशी बिजांचा वापर वाढवण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच देशात विविध प्रकारचे देशी बीज असून ते वाचवण्याची सध्या गरज असल्याचा सल्ला त्यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाला दिला. गेल्या काही दिवसांमध्ये नदीचे पुनरुज्जीवन, तसेच जलयुक्त शिवाराचे काम झाले. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली असल्याचे श्री श्री रविशंकर यांनी सांगत शेतकऱ्यांना धन्यवाद दिले.