अनिल कपूर आणि त्याची पत्नी सुनिता कपूर यांनी आज त्यांच्या प्रपोजलची ऍनिव्हर्सरी साजरी केली. सुनिता यांना आपण कसे प्रपोज केले होते, याची हकिगत अनिल कपूरने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केली आहे. ही एक लव्ह स्टोरी आहे. 17 मे या दिवशी आपण एक मोठा सिनेमा स्वीकारला होता. करिअरमध्ये हा सिनेमा खूपच महत्त्वाचा ठरणार होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी 18 मे रोजी गर्लफ्रेंड सुनिताला लग्नाची मागणी घातली होती, असे अनिल कपूरने म्हटले आहे.
सर्वसाधारणपणे लोक लग्नाचा वाढदिवस साजरा करतात. पण आम्ही लग्नाच्या प्रस्तावाचाच वाढदिवस साजरा करतो आहोत. कारण हा क्षण आमच्यासाठी किती महत्त्वाचा होता, हे आम्ही विसरू शकणार नाही, असेही त्याने लिहिले आहे. आपल्या लग्नाची सविस्तर कहाणी मंगळवारी सांगू, असेही त्याने सांगितले आहे. अनिल कपूर आणि सुनिता कपूर यांचा विवाह 19 मे 1984 रोजी झाला होता. या दाम्पत्याला नंतर सोनम, हर्षवर्धन आणि रिया कपूर अशी तीन मुले झाली. त्यापैकी सोनमने बॉलीवूडमध्ये जम बसवला आहे. तर हर्षवर्धन अजूनही चाचपडतो आहे.