मुंबई – फॉक्सकॉन आणि वेदांत समूहाचा सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प आता महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवण्यात आला आहे. वेदांत रिसोर्सेस लिमिटेडचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्विटद्वारे याची घोषणा केली.
चार वेगवेगळ्या पोस्ट करताना त्यांनी गुजरातची निवड केल्याचं सांगतानाच लवकरच या प्रकल्पाअंतर्गत भारतभर उद्योगांचं जाळं पसरवण्याचा विचार असल्याचं सांगितलं.
मेड इन इंडिया सेमीकंडक्टरच्या उत्पादनाचा फायदा होईल, असे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी कार्यक्रमात सांगितले होते. याचा फायदा फक्त गुजरातलाच नाही तर देशातील इतर जनतेलाही होईल. यामुळे मोबाईल स्वस्त होतील. लॅपटॉपही कमी किमतीत मिळतील. फॉक्सकॉन आणि वेदांत मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या निर्मितीसाठी महाराष्ट्रात अनेक प्रकल्प आणणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
भारत आत्मनिर्भर होईल
माहितीनुसार, सध्या सेमीकंडक्टर अमेरिका, तैवान, दक्षिण कोरिया यांसारखे देश बनवतात. सध्या देशात सेमीकंडक्टर बनवले जात नाहीत. यामुळेच भारतात मोबाईल फोन, लॅपटॉप, संगणक यासारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महागल्या आहेत. भारतातील बहुतेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू एकत्र केल्या जातात. सेमीकंडक्टरच्या निर्मितीनंतर भारतात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वस्त होतील. यामुळे भारत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्र बनू शकेल.
वेदांत रिसोर्सेस लिमिटेडचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,’वेदांत-फॉक्सकॉन अनेक अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीसाठी साइटचे व्यावसायिक मूल्यांकन करत आहे. ही एक वैज्ञानिक आणि आर्थिक प्रक्रिया आहे ज्याला अनेक वर्षे लागतात. आम्ही त्याची सुरुवात सुमारे २ वर्षांपूर्वी केली होती.
आमच्या टीमने गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू इत्यादी काही राज्ये निवडली आहेत. गेल्या 2 वर्षांपासून आम्ही या प्रत्येक सरकारशी तसेच केंद्र सरकारशी संलग्न आहोत आणि आम्हाला प्रचंड पाठिंबा मिळाला आहे. अब्जावधी डॉलर्सच्या या गुंतवणुकीमुळे भारतीय इलेक्ट्रॉनिक्सची दिशा बदलणार आहे. आम्ही संपूर्ण भारतातील इकोसिस्टम तयार करू आणि महाराष्ट्रातही गुंतवणूक करण्यास आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. आमच्या गुजरात जेव्हीमध्ये पुढील एकात्मतेसाठी महाराष्ट्र आमची गुरुकिल्ली असेल.’ असे त्यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक केली जाणार आहे अशी घोषणा अग्रवाल यांनी केली असली तरी ती नेमकी किती आणि कशी केली जाणार आहे हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही.