अमिताभ बच्चन आणि अजय देवगणचा “मेडे’ हा चित्रपट काही दिवसांपासून खूपच चर्चेत आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत बऱ्याचदा स्क्रीन स्पेस शेअर करणारा अजय देवगण प्रथमच त्यांना दिग्दर्शन करणार आहेत. आता या चित्रपटात आणखी एका कलाकाराची एंट्री झाली आहे. “लव पर स्क्वेअर फूट’मधील अभिनेत्री अंगिरा धर हिला आता अमिताभ बच्चन आणि अजय देवगणसारख्या कलाकारांसमवेत स्क्रीन स्पेस शेअर करण्याची संधी मिळाली आहे. या चित्रपटातील अंगिराची भूमिका खूपच निर्णायक असल्याचे बोलले जात आहे.
“मेडे’मध्ये अंगिरा धरची व्यक्तिरेखा ही एका वकिलाची आहे, जी कथेसाठी खूप महत्त्वाची आहे. या चित्रपटाबाबत अंगिरा म्हणाली, अमिताभ बच्चन आणि अजय देवगण या दोन दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. अजय देवगण यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची मी वाट पाहात आहे. तो एक जबरदस्त अनुभव असेल, असे तिने सांगितले. या महिन्यात हैदराबादमध्ये चित्रपटाचा श्रीगणेशा होणार आहे. या चित्रपटात रकूलप्रीत सिंहही मुख्य भूमिका साकारत आहे.
दरम्यान, अजय हा बॉलीवूडमधील अशा कलाकारांपैकी एक आहे ज्याने एक अभिनेता म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर दिग्दर्शनाच्या दिशेने वाटचाल केली. “मेडे’ची निर्मिती अजय देवगणची कंपनी अजय देवगण फिल्म्स करत आहे. त्याचबरोबर अजय हाच चित्रपटाचे दिग्दर्शनही करणार आहेत. “यू मी और हम’ आणि “शिवाय’नंतर “मेडे’ हा अजयचा तिसरा दिग्दर्शित चित्रपट आहे.