वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा होत आहे. या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी मावळ तालुका वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
मावळ तालुक्यातील दारुंब्रे येथील रहिवासी संजय आगळे यांना गावातील स्वस्त धान्य दुकानातून कीडे व पावडर झालेल्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या गव्हाचा पुरवठा झाला. त्यांनी याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी या निकृष्ट गव्हासह तालुका पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली. परंतु सुटीमुळे कार्यालय बंद होते.
वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष नितीन ओव्हाळ, जिल्हा उपाध्यक्ष संतोष लोखंडे, तालुका युवक आघाडी अध्यक्ष संदीप कदम, उपाध्यक्ष मनिषा ओव्हाळ, सचिव वृषाली कदम यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला.
मावळ तालुक्यात झालेला हा निकृष्ट दर्जाचा धान्य पुरवठा नक्की कोणत्या पातळीवर झाला. शासनाकडूनच तो आला की दुकानदाराने तो केला, याची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. जेवरेवाडी येथील यशवंत शेलार यांनी कुटुंबात दहा माणसे असताना आठ माणसाचे धान्य मिळत असल्याची तक्रार केली. अनेकदा हेलपाटे मारूनही दखल घेतली जात नाही. स्वस्त धान्य दुकानदार व पुरवठा विभाग एकमेकांकडे टोलवा टोलवी करत असल्याचे गाऱ्हाणे त्यांनी मांडले.