पुणे – सध्या मेट्रोच्या दोन्ही मार्गांंवर पार्किंगच्या जागाच नसल्याने प्रवाशांच्या संख्येवर त्याचा परिणाम होत आहे. ही बाब लक्षात घेऊन पीएमआरडीएच्या शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाचे पूर्ण होण्याआधीच प्रत्येक स्थानकाच्या परिसरात पार्किंगची जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
या मेट्रो प्रकल्पाचा आढावा तसेच या कामातील समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी महापालिका आणि पीएमआरडीएच्या अधिकार्यांची बैठक नुकतीच पार पडली. हा मेट्रो मार्ग मार्च २०२५ पासून पुणेकरांच्या सेवेत सुरू करण्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. मेट्रो ३ प्रकल्प सुमारे २३ किलोमीटरचा असून, या मार्गात २३ स्थानके आहेत. त्यातील, १५ स्थानके पुणे महापालिका हद्दीत येतात.
मेट्रो मार्ग-३ साठी महापालिकेकडून स्थानकांच्या २०० मीटर परिसरातील जागा देण्यात येणार आहेत.
अशा जागांची यादी पीएमआरडीएकडे देण्यात येणार आहे. या शिवाय, काही स्थानकांसाठी भूसंपादन करून एकाच वेळी २३ स्थानकांचे काम हाती घेतले जाणार आहे. पुढील नऊ महिन्यांत ते पूर्ण केले जाणार आहे. गणेश खिंड रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अडथळा ठरणारी झाडे काढण्यास न्यायालयाने मनाई केली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल लवकरात लवकर न्यायलात सादर केला जाणार आहे.