पुणे, दि. 13 -स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून दी पूना मर्चंट्स चेंबरतर्फे “अनेकता मे एकता’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविधतेमध्ये एकतेचा संदेश देण्यासाठी विविध राज्यातील नागरिकांप्रमाणे वेशभूषा करुन चेंबरचे सभासद सहभागी झाले होते.
रॅलीची सुरुवात मार्केट यार्डातील गुळ भूसार विभागातील गेट क्र. 4 पासून झाली. तसेच, कृषी उत्पन्न बाजार समिती येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांतजी गरड, दी पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी पुष्पहार अर्पण करुन समारोप केला.
यावेळी “भारत माता की जय’ व “वंदे मातरम’ च्या जयघोषाने मार्केट यार्ड परिसर दणाणून गेला. रॅलीमध्ये शिवाज्ञा ढोलताशा पथक विशेष आकर्षण ठरले. चेंबरचे सर्व माजी अध्यक्ष, सर्व व्यापारी, दलाल बंधू, हमाल, आडते, बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह सर्व घटक सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण चोरबेले, आशिष दुगड, संदीप शहा, दिनेश मेहता, महिपाल राजपुरोहित, नवीन गोयल, उत्तम बाठिया, हरिराम चौधरी, प्रकाश नहार आदिनी परिश्रम घेतले.