मुंबई – अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील आमदार कै. रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी 14 ऑक्टोबर रोजी इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माहिती कागदपत्रांसह दाखल केले होते. त्यानुसार निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या अर्जांची छाननी करून 14 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविले आहेत.
त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार व कै. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांची प्रमुख नावे व त्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे शिवसेना व भाजप उमेदवारांमध्ये खरी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही निवडणूक होण्यापूर्वीच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या पालिका सेवेतील राजीनाम्याचे प्रकरण चांगलेच गाजले. पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे ऋतुजा लटके यांची उमेदवारी व शिवसेनाही अडचणीत आल्याचे चित्र होते. मात्र प्रकरण न्यायालयात गेले व ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा मिळाला आणि त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
भाजपला अंधेरी पोटनिवडणूक ‘जड’ जाणार; ही 3 मुख्य कारणे असू शकतात https://t.co/l5RG305vcY
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 16, 2022
या निवडणुकीसाठी नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी 14 उमेदवारांची नामनिर्देशने वैध ठरली आहेत. त्यामध्ये, राष्ट्रीय पक्षांचे दोन उमेदवार, नोंदणीकृत पक्षांचे तीन तर अपक्ष व इतर पक्षांचे नऊ उमेदवार आहेत. तर येत्या सोमवारी म्हणजेच 17 ऑक्टोबर 2022 रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
दरम्यान, राज्यातील राजकारणातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा दाखला देत एखाद्या ठिकाणी आमदाराचे अकाली निधन झाल्यास आणि त्याठिकाणी त्याच्या घरातील व्यक्ती पोटनिवडणुकीत उभा असल्यास निवडणुक बिनविरोध होते. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती असल्याचे सांगितले जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ही निवडणुक बिनविरोध करावी, भाजपने आपला उमेदवारा मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. त्यावर आता भाजप काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे आहे, उद्या 17 ऑक्टोबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे भाजप उमेदवार आपला अर्ज मागे घेणार का ? हे उद्या स्पष्ट होईल.