सोलापूर – सोलापुरातील 4 वर्षाची चिमुकली उंजल दासीला हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी तातडीने मुंबईला जायचे होते. याचवेळी नाना पटोले हे हेलिकॉप्टरने सोलापूरला आले होते. याप्रसंगी घटनेचे गांर्भीय ओळखत त्यांनी स्वतःचे हेलिकॉप्टर संबंधित मुलीच्या कुटुंबाला मुंबईला जाण्यासाठी दिले, अशी माहिती कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली. तसेच नाना पटोले हे रेल्वेने मुंबईला रवाना झाले.
सोलापूरमधील रहिवाशी तुकाराम दासी यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना भेटून त्यांची लहान मुलगी उंजलला हृदय विकाराच्या आजार असल्याची माहिती दिली. मुलीवर तत्काळ शस्त्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे असून शस्त्रक्रिया लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी केली होती.
त्यानुसार आमदार प्रणिती शिंदे यांनी नाना पटोले यांना उंजलला उपचारासाठी पाठविण्याकरीता स्वतःचं हेलिकॉप्टर देण्याची विनंती केली. त्यानुसार नाना पटोले यांनी स्वतःच्या हेलिकॉप्टरने उंजलला मुंबई येथे हृदय विकाराच्या उपचाराकरीता पाठविले व स्वतः रेल्वेले मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.
याविषयी कॉंग्रेसच्या मेळाव्यात कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी माहिती दिली. तसेच नाना भाऊंनी त्यांचा दौरा रद्द केला. सोलापूरमध्ये एका मुलीचे नातेवाईक माझ्याकडे आले होते. त्यांना मुलीचं ह्रदयाचं ऑपरेशन करण्यासाठी मुंबईला जायचं होतं. नाना पटोले यांना हे समजल्यावर त्यांनी त्यांचं हेलिकॉप्टर त्या मुलीला मुंबईला जाण्यासाठी दिलं आणि आता ते सिद्धेश्वर एक्स्प्रेसनं मुंबईला जातील. ती मुलगी बरी होऊन सोलापूरमध्ये परत येऊदेत आणि नानाभाऊंना आशीर्वाद मिळू देत, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.