डॉ. नीलम गोऱ्हे यांची तत्परता कामी
फुरसुंगी – हडपसर येथील विनोद शिंदे (रा. हडपसर) यांच्या कुटुंबातील 15 दिवसांच्या चिमुकलीचे रुटीन चेकिंग झाल्यानंतर मुलीची प्रकृती नाजूक असल्याने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल, असे संबंधित डॉक्टरांनी सांगितले.
कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये नेण्याबाबत चिठ्ठी देण्यात आली; परंतु करोनामुळे व जागा शिल्लक नसल्याने तेथे प्रवेश नाकारण्यात आला. यामुळे शिंदे कुटुंबातील सदस्यांनी पुण्यातील 18 हॉस्पिटलशी संपर्क साधला. कोठेही चिमुकलीवर उपचाराची तयारी दाखविण्यात आली नाही. अखेर, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख शादाब मुलाणी यांच्याशी शिंदे कुटुंबीयांनी संपर्क साधला. तर ही बाब मुलाणी यांनी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना सांगितली.
डॉ. गोऱ्हे यांनी या चिमुकलीला ससूनमध्ये दाखल करण्याबाबत सूचना केल्या; परंतु करोनामुळे हे रुग्णालयही भरलेले असल्याने येथेही उपचार अवघड होते. डॉ. मुरलीधर तांबे यांना एक बेड उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली, त्यावेळी रात्रीचे एक वाजले होते. डॉ. तांबे यांनीही हॉस्पिटलमध्ये सूचना केल्या. पहाटे दोनपर्यंत बेड मिळण्याची धडपड सुरूच होती. अखेर, अडीच वाजता ससून सीएमओ यांना डॉ. गोऱ्हे यांच्याकडून फोन गेले आणि त्या चिमुकलीला एक बेड उपलब्ध होऊन तिच्यावर उपचार सुरू झाले. आजही बेबी सुस्थितीत आहे. डॉ. गोऱ्हे यांच्या तत्परतेमुळे हे शक्य झाल्याची भावना शिंदे कुटुंबीयांत आहे.