वडगाव मावळ -जुन्या पुणे- मुंबई महामार्गाच्या दुतर्फा साईटपट्टयांवर अनधिकृतपणे टेम्पो व हातगाड्या उभ्या करून विविध पदार्थांची विक्री केली जात आहे. या वस्तूंच्या खरेदीसाठी महामार्गावरुन जाणारी वाहने अचानक थांबल्याने महामार्गावर किरकोळ व गंभीर स्वरूपाचे अपघात घडत आहेत. तसेच महामार्गावरील वाहतुकीस या दुकानांचा अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या देखील उद्भवत आहे.
मागील महिनाभरापासून देहूरोड ते कार्ला दरम्यानच्या मुंबई पुणे महामार्गावरील साईट पट्यांवर फळ,भाजीवाले, कपडे, खेळणी, शोभेच्या वस्तु, चटई, धान्य अशा अनेक वस्तूंची विक्री करण्यासाठी हातगाड्या, टेम्पो साईटपट्टयावर दुकाने मांडून विक्रीसाठी बसत आहेत. खुल्या बाजारभावाच्या तुलनेत कमी किमतीत वस्तु मिळत असल्याचे सांगत असल्याने खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मागून येणारी वाहने थांबलेल्या वाहनास धडकून अपघात घडत आहेत. तसेच संध्याकाळच्या वेळी हे विक्रेते कमी किमतीत वस्तूंची विक्री करत असल्याने प्रवासी यांच्याकडे गर्दी करत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.
महामार्गालगत बसून विविध वस्तूंची विक्री करणारे विक्रेते सुरक्षततेची कुठलीही काळजी घेत नाहीत. यामुळे महामार्गावरून वेगात येणाऱ्या वाहनांचे नियंत्रण सुटल्यास या विक्रेत्यांचा बळी जाऊ शकतो. वस्तूंची विक्री करणाऱ्याकडे कुठलीही परवानगी व परवाने नाहीत ते कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचा कर देखील भरत नाहीत. तरी देखील त्यांच्यावर कोणीच कारवाई का करत नाहीत असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
यासंदर्भात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन लांडगे यांना विचारले असता ते म्हणाले की, अश्या दुकानांवर वाहतूक पोलीस व नगरपरिषदेने कारवाई करणे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले. तर याबाबत रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक यांच्याशी संपर्क न होऊ शकल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.
तळेगाव दाभाडे व वडगाव नगरपंचायत हद्दीतील महामार्गालगत अनधिकृतपणे वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर कारवाई
करण्यात येईल.
– विजय सरनाईक, मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे नगरपरिषद व वडगांव नगरपंचायत
जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत धोकादायक व अनधिकृतपणे वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल.
– विलास भोसले, पोलीस निरीक्षक,वडगाव मावळ पोलीस ठाणे