आंबेगाव तालुक्यात एकाच दिवशी दहा रुग्णांची वाढ
मंचर (प्रतिनिधी) – शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या एका सुरक्षा रक्षकाला करोनाची बाधा झाली असून, आंबेगाव तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या गुरुवार (दि. 9) पर्यंत 83 झाली आहे. यामध्ये मंचर येथील तीन, कोलदरे येथील तीन, तर लांडेवाडी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. एकाच दिवसात 10 रुग्ण वाढल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यात या अगोदर सापडलेल्या 19 बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचे स्वॅब पुणे येथे तपासणीसाठी वैद्यकीय विभागाच्या वतीने पाठविण्यात आले होते. त्यामध्ये दहा रुग्ण बाधित असल्याचे रिपोर्ट आले आहेत. रिपोर्टनुसार मंचर येथे तीन रुग्ण सापडले असून, यामध्ये दोन पुरुष (वय 26, 27) तर एक महिला (वय 34) रुग्ण आहे. कोलदरे या ठिकाणी तीन रुग्ण सापडले असून, तिन्ही रुग्ण पुरुष (वय 30, 32,65) आहेत आणि घोडेगावमध्ये एक पुरुष (वय 40), लांडेवाडीमध्ये एक पुरुष (वय 51), महाळुंगे पडवळ येथील दोन रुग्णांमध्ये एक 70 वर्षीय महिला व 59 वर्षीय पुरुष आहे.
आलेल्या आकडेवारीनुसार आंबेगाव तालुक्यात एकूण रुग्ण संख्या दहाने वाढली आहे. आंबेगाव तालुक्यात आत्तापर्यंत 83 बाधित रुग्ण सापडले असून त्यामध्ये 32 रुग्णांवर उपचार चालू आहेत. तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि 48 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती आंबेगाव तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली.
सुरक्षा रक्षकाच्या संपर्कात आढळराव नाहीत….
या रुग्णांमध्ये शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सुरक्षा रक्षकाचा समावेश आहे; परंतु तो सुरक्षा रक्षक गेल्या पंधरा दिवसांपासून माजी खासदार आढळराव पाटील यांच्या संपर्कात नसल्याचे सांगण्यात आले आहे.