अपहरणकर्त्यांचा पाठलाग; आरडाओरडा करत सोडवले
पुणे – आईशेजारी झोपलेल्या एका तीन वर्षीय चिमुरडीचे मध्यरात्री अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, मुलीच्या आईला जाग आल्याने तिने अपहरणकर्त्यांचा पाठलाग करून आरडाओरडा करत मुलीची सोडवणूक केली. नागरिक गोळा झाल्याचे लक्षात येताच अपहरणकर्त्यांनी तेथून पळ काढला.
आंबेगाव पठार परिसरात हा प्रकार बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास घडला. याप्रकरणी सायस सिद्धराम केंद्रे (रा. आंबेगाव पठार) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारदार केंद्रे दाम्पत्य आंबेगाव पठार परिसरात राहण्यास आहेत. सिद्धराम हे टॅंकरचालक असून सायस गृहिणी आहेत. त्यांना दोन मुले आहेत. बुधवारी रात्री केंद्रे दाम्पत्य मुलांसोबत झोपले होते. त्यावेळी तेथे आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने खिडकीतून केंद्रे यांच्या घराची कडी उघडून आत प्रवेश केला.
या व्यक्तीने सायस यांच्या शेजारी झोपलेल्या तीन वर्षीय मुलीला ताब्यात घेतले. ही व्यक्ती तेथून बाहेर जात होती. त्याचवेळी अचानक सायस यांना जाग आली. आपल्या मुलीला कोणीतरी घेऊन जात असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तातडीने पती सिद्धराम यांना उठवत त्याचा पाठलाग केला.
सुमारे शंभर ते दोनशे मीटरपर्यंत दोघांनी आरडाओरडा करत या अपहरणकर्त्यांचा पाठलाग केला. त्यामुळे या व्यक्तीने घाबरून या चिमुकलीला खाली ठेवले. आरडाओरड झाल्यामुळे या परिसरातील नागरिक गोळा झाल्यानंतर अपहरणकर्त्याने पळ काढला. त्यानंतर या घटनेची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना देण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.