नवाब मलिक यांनी सुचवली पर्यायी जागा
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत “मुंबई मेट्रो’साठी आरेमधील कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याची घोषणा केली होती. त्यानंतर मेट्रो कारशेडसाठी आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी नवा पर्याय सुचवला आहे. “आरे’च्या बाजूलाच असलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या परेड ग्राऊंडवर कारशेड होऊ शकते, अशी भूमिका त्यांनी मांडली.
विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरु झाल्यानंतर नवाब मलिक यांनी मुंबई मेट्रोबाबत गैरसमज पसरवला जात असल्याचा आरोप केला. आरेच्या बाजूलाच असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या परेड ग्राऊंडवर कारशेड होऊ शकते, अशी भूमिका त्यांनी मांडली. कारशेडसाठी 30 हेक्टर जागेची गरज आहे. एसआरपीएफ कॅंम्पमध्ये 41 हेक्टर जागा असून मुख्यमंत्र्यांनी या जागेचा विचार करावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी सभागृहात केली.
दरम्यान, यापुढे एकाही झाडाचे पान आता तोडले जाणार नाही. आमचा विरोध मेट्रोला नाही, तर पर्यावरणाच्या ऱ्हासाला आहे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली होती. या निर्णयावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. मात्र आमदार नवाब मलिक यांनी नवा पर्याय सुचवत मार्ग काढला आहे.