काठमांडू – रामायणावर आधारलेल्या “आदिपुरुष’या बहुभाषिक सिनेमामुळे भारतात अनेक देशांमध्ये वाद निर्माण झाले आहेत. त्याबरोबर नेपाळमध्ये या सिनेमातील वादग्रस्त संवादांमुळे सर्व हिंदी सिनेमांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही या वादामध्ये उडी घेतली असून “कोणालाही धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार नाही.’ असे वक्तव्य केले आहे. “आदिपुरुष’च्या विरोधात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि नवी दिल्लीत काही ठिकाणी निदर्शने झाली. चित्रपटाचे संवाद लेखक मनोज शुक्ला यांच्या विनंतीवरून मुंबई पोलिसांनी चित्रपटगृहांना संरक्षण देण्याचे मान्य केले आहे.
नेपाळमध्येही “आदिपुरुष’च्या विरोधात वातावरण निर्माण झाले आहे. मात्र ते त्यातील संवादांमुळे नसून “सीतेला भारत कन्या’ असे दर्शवण्यात आल्यामुळे हा विरोध होतो आहे. या निमित्ताने सर्व हिंदी चित्रपटांच्या नेपाळमधील प्रदर्शनाला बंदी घालण्यात आली आहे. जोपर्यंत “आदिपुरुष’मध्ये अनुरुप बदल केले जात नाहीत, तोपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.
“आदिपुरुष’ हा चित्रपट शुक्रवारी एकाचवेळी हिंदी, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये अभिनेता प्रभासने भगवान रामाची भूमिका केली आहे. तर क्रिती सेननने सीतेची आणि सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे. या सिनेमाने 3 दिवसात जगभरात 340 कोटींचा धंदा केला आहे.