नागपूर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख थेट आधुनिक भारताचे राष्ट्रपिता असा केला आहे. नागपुरातील एका कार्यक्रमादरम्यान अमृता फडणवीस यांनी सध्याच्या राजकारनासह विविध गोष्टींवर चर्चा केली. अमृता फडणवीस यांनी मोदींचा राष्ट्रपिता असा उल्लेख करण्याची ही पहिलीच वेळ नाही.
नागपुरात अभिरुप न्यायालयाचं आयोजन करण्यात आलं होत यावेळी अमृता फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. “महात्मा गांधी हे तेव्हाचे राष्ट्रपिता होते. मोदी हे नव्या भारताचे राष्ट्रपिता आहेत” असं अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या. यापूर्वीही पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त अमृता फडणवीस यांनी मोदींना शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख ‘राष्ट्रपिता’ असा केला होता.
आदित्य ठाकरे हे रेश्माच्या गादीवर बसून आल्याचा टोलाही यावेळी अमृता फडणवीस यांनी लगावला. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षा अधिक कमावता हे खरं आहे का ? असा सवाल देखील यावेळी अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या,हो हे खरं आहे,कारण त्यांनी कधी पैसे कमावलेच नाही जीवनात त्यांनी केवळ लोकसेवा केली आहे.