संगमनेर – तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. 26 ग्रामपंचायतींवर माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व दिसून आले. तर 9 ग्रामपंचायती विखे गटाकडे गेल्या आहेत. तर घुलेवाडी व निळवंडे ग्रामपंचायतीवर अपक्ष सरपंच विजय झाले आहेत. यामध्ये आ. थोरात यांच्या जोर्वे गावामध्ये सरपंच विखे गटाचा निवडून आला असून तळेगाव दिघे, कोल्हेवाडी हे विखे गटाकडे गेले आहेत. तर निळवंडे गावामध्ये प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या सासूबाई अपक्ष म्हणून निवडून आल्याने तालुक्यात निळवंडे गाव आकर्षणाचा विषय ठरला आहे.
आ. थोरात यांच्या जोर्वे गावात विखे गटाच्या सरपंच प्रिती गोकुळे दिघे या निवडून आल्या आहेत. परंतु थोरात गटाचे 9 सदस्य विजयी झाले आहेत. तर विखे गटाचे 4 सदस्य निवडून आले आहेत. त्याचबरोबर निळवंडे ग्रामपंचयतीमध्ये सरपंच म्हणून समाजप्रबोधनकार निवृत्ती महारज देशमुख (इंदोरीकर) यांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार या अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. परंतु त्या विखे गटाला पाठिंबा देणार असल्याचे समजते.
तसेच तळेगाव दिघे हा आ. थोरात यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना ताकद देवून त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहून सरपंच पदासह 9 सदस्य जिंकून आणले. त्यामुळे थोरात गटाला हा मोठा धक्का बसला असून स्थानिक कार्यकर्त्यांवरील नाराजी मतदारांनी मतदानामधून दाखवून दिली आहे.कोल्हेवाडी याठिकाणी देखील विखे गटाचा सरपंच देखील मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. तर विखे यांच्या मतदार संघातील निमगाव जाळी व उंबरी बाळापूर याठिकाणी आ. थोरात यांच्या गटाचे सरपंच विजयी झाले आहेत. त्यामुळे थोरात व विखे या दोघांनी देखील एकमेकांच्या मतदारसंघात घुसखोरी केलेली दिसत आहे.
यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार गणेश तळेकर, उमांकात कडनोर यांसह सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात क्रिडा संकुलमधील बॅडमिंटन हॉलमध्ये ही मतमोजणी झाली.
शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरूण आव्हाड यांनी क्रिडा संकुलाच्या बाहेर बॅरिगेटस् लावून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.
विजयी झालेले सरपंच पुढीलप्रमाणे: स्मिता नानासाहेब शिंदे (वाघापूर), ज्योती बाळासाहेब पवार (खराडी), विलास रामराव सोनवणे (चंचोली गुरव), शांताबाई आण्णासाहेब कुदनर (जांभुळवाडी), बाबाजी मल्हारी गुळवे (रणखांबवाडी), आनंदा रावसाहेब दुरगुडे (दरेवाडी), निलम अमोल पारधी (सायखिंडी), सोनाली रमेश शेटे (जांबुत बुद्रुक), रोहिणी वाल्मीक भागवत (कर्जुले पठार), मंगल बाळासाहेब काकड (बिनविरोध, डोळासणे), नारायण सिताराम मरभळ (पिंपरणे), सुवर्णा राहुल दिघे (कोल्हेवाडी), सुरेखा भाऊसाहेब खेमनर (अंभोरे), पुष्पा योगेश गुंजाळ (कोळवाडे), भागिरथीबाई माधव काठे (निंबाळे), प्रिती गोकुळ दिघे (जोर्वे), संध्या संदीप गोर्डे (वडझरी बु.), संदीप भास्कर देशमुख (निमोण), पांडुरंग कारभारी सुपेकर (वडझरी खुर्द), बाळासाहेब रावसाहेब आहेर (करुले), शशिकला शिवाजी पवार (निळवंडे), कमल राजेंद्र कांगणे (हंगेवाडी), ज्योती अंकुश पचपींड (कनकापूर), गिरीजा आण्णासाहेब साबळे (ओझर खुर्द), नारायण निवृत्ती गुंजाळ (सादतपूर), सविता लक्ष्मण शिंदे (रहिमपूर), अर्चना सुभाष भुसाळ (उंबरी बाळापूर), प्रतिभा सोमनाथ जोंधळे (निमगाव जाळी), गायत्री सुरेश माळी (चिकणी), लता भास्कर खताळ (धांदरफळ खुर्द), उज्वला नवनाथ देशमाने (धांदरफळ बु.), उषा रमेश दिघे (तळेगाव दिघे), सचिन दिनकर सोनवणे (साकूर), ज्योती मचंछिद्र कडलग (निमगाव भोजापूर), सुदाम गोरख खैरे (पोखरी हवेली), सुवर्णा संदीप घुगे (मालुंजे), निर्माला कैलास राऊत (घुलेवाडी)