मुंबई – राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला आहे. मिटकरी यांनी एका भाषणात राज ठाकरे यांच्या उल्लेख खाज ठाकरे केल्यानंतर मनसे नेते आता आक्रमक झाले आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्वीटरवर अमोल मिटकरींच्या जुन्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात मिटकरी शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यावर टीका करत असल्याचे दिसत आहे.
सदर व्हिडीओत मिटकरी संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यक्रमात भाषण देताना विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसत आहे.
मटण करी जाणते राजे,दादा आणि बेस्ट मुख्यमंत्री यांच्याबद्दल थोर विचार मांडताना …😂 pic.twitter.com/3EHgVu7W74
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) April 21, 2022
काय आहे व्हिडीओत?
उद्धव ठाकरे यांच्याविषयी मिटकरी म्हणतात की, “उद्धव ठाकरे साहेब एकच वाक्य म्हणतायत की शेतकऱ्यासाठी सत्तेला लाथ मारु. मारा ना. लाथ पुरत नसेल तर आम्ही प्लास्टिकचा पाय आणून देतो, मारा ना लाथ,” तसेच पुढे बोलताना ते म्हणतात, “तुम्ही फक्त बोलता करत काही नाही. याचं कारण म्हणजे शिवसेना हा वाचाळ झालेला पक्ष आहे.”
शरद पवार यांच्याविषयी मिटकरी म्हणाले की, “काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उतून जाऊ नये. तुम्ही भ्रष्ट होते म्हणून आम्ही भाजपाला मत दिलं. तुम्ही बीसीसीआयचे नेते होते की शेतकऱ्यांचे हा आमच्यासमोर प्रश्न आहे. तुम्ही शेतकऱ्यांसाठी काही केले असते, जर तुम्ही प्रमाणिक असते आणि प्रमाणिकपणे काम केले असते तर आम्हाला आज संभाजी ब्रिगेड स्थापन करायला संधीच मिळाली नसती.”
अजित पवार यांच्याविषयी ते बोलतात की, “आम्ही शेतकऱ्याची मुले. पाणी मागायला आलो तुमच्याकडे तर तुम्ही म्हणता आम्ही धरणात मुततो. धरणात मुतायची मिजास केली म्हणून इथे आम्ही तुमचे राजकारण संपवले. आता कोणता दादा नाही आणि ताई नाही. तर आपले पदाधिकारी राष्ट्रवादीचे लांगुनचालन करत असतील तर त्यांच्यावर थेट कारवाई करावी,” असे अमोल मिटकरींनी त्यांच्या जुन्या व्हिडीओत बोलल्याचे दिसते.